(मुंबई)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा आजपासून ( 10 फेब्रुवारी) सुरू होत आहेत, तर इयत्ता दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर आणि महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात असल्याचं सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, कोणतेही दडपण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा आणि परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा. सर्व विद्यार्थी हे देशाचं भविष्य असून, प्रामाणिकपणा आणि मेहनत हीच त्यांची खरी ओळख आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि कायम लक्षात राहणारा टप्पा असून, गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी परिश्रमपूर्वक तयारी केली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र मेहनत घेतली असून, त्या कष्टांना निश्चितच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मंत्री भुसे म्हणाले की, परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या हातात केवळ उत्तरपत्रिका नसून आई-वडिलांची स्वप्नं आणि अपेक्षाही असतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि शांत मनाने परीक्षा द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, पुरेशी झोप घ्यावी, सकस आहार घ्यावा, मन शांत ठेवावं आणि कोणताही ताण न घेता वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावं, असं आवाहन करत मंत्री दादा भुसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली व 18 तृतीयपंथी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीची विद्यार्थीसंख्या सुमारे 27 हजारांनी वाढली आहे. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत 3387 मुख्य केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थीसंख्या
पुणे – 2 लाख 60 हजार 14
नागपूर – 1 लाख 60 हजार 530
छत्रपती संभाजीनगर – 1 लाख 91 हजार 493
मुंबई – 3 लाख 52 हजार 718
कोल्हापूर – 1 लाख 16 हजार 611
अमरावती – 1 लाख 56 हजार 915
नाशिक – 1 लाख 73 हजार 651
लातूर – 96 हजार 542
कोकण – 24 हजार 13
शाखानिहाय विद्यार्थी
कला – 3 लाख 80 हजार 692
वाणिज्य – 3 लाख 20 हजार 152
विज्ञान – 7 लाख 99 हजार 773
व्यावसायिक अभ्यासक्रम – 27 हजार 378
आयटीआय – 4 हजार 492

