(रत्नागिरी)
जिल्ह्यातील शेतकरी, प्रक्रियादार आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय खरेदीदार–विक्रेता संमेलन व फणस प्रक्रिया कार्यशाळा २०२६’ उत्साहात पार पडली. या संमेलनात ५.१३ कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले असून, जिल्ह्याच्या कृषी व्यापारासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५१० प्रकल्पांमुळे मूल्यवर्धनाला चालना
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५१० प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मितीबरोबरच कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनालाही गती मिळाली आहे.
फणस प्रक्रियेवर विशेष लक्ष
कोकणातील महत्त्वाचे पीक असलेल्या फणसाच्या प्रक्रियेबाबत कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. फणसाचे नुकसान टाळून त्यातून अधिक आर्थिक मूल्य कसे निर्माण करता येईल, यावर भर देण्यात आला.
अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी हे संमेलन नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले. रत्नागिरी हा फलोत्पादनासाठी ओळखला जाणारा जिल्हा असून, अशा उपक्रमांमुळे येथील शेतकरी आणि प्रक्रियादारांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध होतील, असे मत उपाध्यक्ष विलास चाळके यांनी व्यक्त केले. त्यांनी कृषी योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही केले.
या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती आणि बँकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘APEDA’च्या माध्यमातून निर्यात क्षेत्रातील संधी, प्रोत्साहन आणि आव्हानांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
विक्रमी ५.१३ कोटींचे करार
संमेलनाच्या अंतिम सत्रात खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये थेट संवाद साधण्यात आला. यामधून एकूण ५.१३ कोटी रुपयांचे सामंजस्य करार निश्चित झाले.
या संमेलनाला जिल्ह्यातील ५०० हून अधिक शेतकरी, प्रक्रियादार आणि खरेदीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

