(रत्नागिरी)
शिर्के प्रशाला आणि ल. ग. पटवर्धन प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही शाळांचा संयुक्त कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ध्वजवंदनासह शासनाच्या निर्देशानुसार सादर करण्यात आलेली संगीत कवायत हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या ठेक्यावर सादर केलेल्या कवायत संचलनामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीची भावना दाटून आली. विद्यार्थ्यांचे हे उत्कृष्ट सादरीकरण घडवून आणण्यासाठी फुटक मॅडम आणि वेदरे सर यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे, उपस्थित मान्यवर, पालक तसेच माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या औचित्याने शाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या विशेष कामगिरीचा गौरव करण्यात आला. विराज स्वप्निल सावंत याने दुबई येथे झालेल्या इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत सहभाग घेत इंटरनॅशनल सेकंड रँक पटकावला. तर मीरा मकरंद झगडे हिने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून ‘किंगडम वर्ल्ड रेकॉर्ड इन भरतनाट्यम’मध्येही तिचा सहभाग नोंदवला गेला.
देशभक्तीपर गीतगायन, असाक्षर मुक्त गाव शपथ, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार अशा विविध उपक्रमांमुळे प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

