(चिपळूण)
गुहागर तालुक्यातील गिमवी येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक बंदूक, शिकार केलेले रानडुक्कर आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई-पाटील व सहाय्यक संरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चिपळूण परिक्षेत्राचे वनाधिकारी सरवर खान, गुहागरचे वनपाल अमित निमकर, चिपळूणचे वनपाल सावंत, सिद्धेश्वर गायकवाड, तसेच अरविंद मांडवकर, कुमार पवार, वनरक्षक राहुल गुंठे व कृष्णा इरमले यांच्या पथकाने ही मोहिम राबवली.
सोमवारी (ता. २३) रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास गिमवी परिसरात गस्त घालत असताना पथकाला विना नंबरप्लेटची चारचाकी गाडी संशयास्पद स्थितीत आढळली. वाहनाची तपासणी केली असता, त्याच्या मागील भागात शिकार करून ठार मारलेले मोठे रानडुक्कर आढळून आले. तसेच वाहनात डबल बॅरल १२ बोअर बंदूकही सापडली.
प्राथमिक तपासात ही शिकार प्रसाद सुभाष सोम, रोशन रमेश मोरे आणि संदीप वसंत गावडे (सर्व रा. गिमवी) यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वनविभागाने तिघांनाही ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

