(रत्नागिरी)
स्त्री-पुरुष हे एकमेकांचे सहभागीदार आहेत. पुरुषही स्त्रिला स्वयंपाकामध्ये मदत करू शकतात. परंतु बऱ्याचदा तशी संधी घरातील महिला त्यांना देत नाहीत. वास्तविक पाहता पती-पत्नी या दोघांनीही एकमेकांच्या सहकार्याने राहायला पाहिजे. महिलांनादेखील पुरुषांप्रमाणे समान संधी मिळाली, तर खऱ्या अर्थाने लिंग समानता प्रस्थापित होऊ शकते. महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता, सक्षमीकरण आवश्यक असून, या परिषदेत त्यावर विचारमंथन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. महिला सक्षमीकरणातून नक्कीच देशाची प्रगती होणार आहे, असे प्रतिपादन रमा पुरुषोत्तम फाउंडेशनच्या संचालिका चित्रा बुझरुक यांनी केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातर्फे विवा एक्झिक्यूटीव्हमध्ये ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ यावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने ही परिषद सुरू आहे. या प्रसंगी मंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, बीजभाषक डॉ. लीना बावडेकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पी. एम. उषा समन्वयक व शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम उपस्थित होत्या.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर परिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रगतीचा आढावा घेतला.
बुझरुक पुढे म्हणाल्या, महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजे. त्यासाठी कोणतीही सबब न सांगता चालणे, खेळ, धावणे, योगासने आवश्यक आहेत. सद्यस्थितीत तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, त्यासाठी नवनवीन शिक्षण घेत राहायला हवे, जिथे शिक्षणाची संधी मिळेल ती साधली पाहिजे. शिक्षणाने आपली निर्णयक्षमता विकसित होते. स्वतः निर्णय घेऊन त्या निर्णयाची जबाबदारी घेणेही आवश्यक असते. तुमचा स्वभाव, आवड आणि बाजारातील मागणी यांचा विचार करून शिक्षण घेतले तर नक्कीच यश मिळते.
बुझरुक म्हणाल्या की, अलिकडे लग्न करताना मुलींच्या अनेक अटी असतात. पण जेव्हा तुम्ही नोकरी, व्यवसायात मोठ्या पदावर असता तेव्हा तुमच्या मुलांचा सांभाळ घरातील वडीलधारी व्यक्ती करतात. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकली पाहिजे. आपण नातेसंबंध जपले पाहिजेत, तसेच स्वतःचे एक नेटवर्क विकसित केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर करतो असे नसून, त्यासाठी आपल्याला अनेकांची मदत होत असते. तसेच आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. अशा अनेक गोष्टीमुळे समाजात समानता अस्तित्वात येईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक विकास हे हातात हात घालूनच जात असतात. लिंग समानता ही आपल्या घरापासूनच सुरू व्हायला हवी. रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरता ही पूर्वीपासूनच जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्याने पाच भारतरत्न दिले आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाचे चांगले काम उभे राहिले. महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये समस्या समजून त्या सोडवण्याकडे कल दिसतो. या वेळी त्यांनी महिलांच्या हक्क, अधिकार, संरक्षणाबाबत राज्यघटनेतील तरतुदींची सविस्तरपणे माहिती दिली. शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना, महिला बचतगटांचे सक्षमीकरण, उमेद योजनेचा फायदा झालेली काही उदाहरणेसुद्धा त्यांनी सांगितली. महिलेच्या नावावर घर, बेटी बचाव, बेटी पढाव योजना, स्वस्थ नारी, सक्षम परिवार या योजनासुद्धा महत्त्वाच्या आहेत. कामटाळूपणा ही घातक वृत्ती असून, ज्यात पुरुष व स्त्रिया दोघांचाही समावेश होतो. नोकरदार महिलांना खूप आव्हाने असतात. आपल्याला अधिकार, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. एक महिला म्हणून माझ्या स्त्रीत्वाचा उपयोग माझ्या फायद्यासाठी न करणे हे जर तुम्ही पाळलं तर समानता तुमच्याकडे चालत येणार, असे त्या पुढे म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषणात शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, भारतात सगळ्यात मोठी कुटुंब व्यवस्था आहे. त्याला तडा जाऊ नये. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. शिक्षक, प्राध्यापकांनी ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
प्रास्ताविक डॉ. सोनाली कदम यांनी तर सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हाद्ये, मान्यवरांचा परिचय डॉ. निधी पटवर्धन यांनी करून दिला. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी आभार मानले. परिषदेच्या समारोपप्रसंगी उद्या (ता. १३) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस संशोधक महिलांविषयक विविध प्रश्न आणि पैलूंवर भाष्य करणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार असून, विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान, स्त्रीशिक्षण, समानता, त्यांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे. परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात होत आहे.

