(रत्नागिरी)
तालुक्यातील हातखंबा येथील महाविद्यालयाजवळील विद्युत खांबावर काम करत असताना पावसकर नामक कर्मचाऱ्याला अचानक जोरदार विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याची घटना २७ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियमित देखरेखीसाठी विद्युत कर्मचाऱ्यांची टीम हातखंबा महाविद्यालय परिसरात काम करत होती. काम सुरू असतानाच अचानक विजेचा जोरदार शॉक बसल्याने पावसकर हे जोरात ओरडले. त्यांचा आवाज ऐकताच जवळ उपस्थित असलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने तातडीने स्विच बंद केला आणि अधिक अपघात होण्यापासून बचाव झाला. धक्का बसलेले पावसकर यांना तत्काळ उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर विद्युत विभागाच्या कामकाजातील सुरक्षा उपाययोजनांकडे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या बाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी केली जात आहे.