(रत्नागिरी)
वनसंपत्तीचे प्रभावी संरक्षण, सुयोग्य व्यवस्थापन आणि वनसेवेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी वनविभागाने राज्यस्तरावर आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ मार्च २०२६ रोजी जाहीर केलेल्या मानाच्या राज्यस्तरीय पदकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
रत्नागिरी येथे कार्यरत विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा शोभा नरेंद्र देसाई यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे वनविभागात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या गौरवात केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच नव्हे, तर मैदानी पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला आहे. रत्नागिरी वनवृत्तातील वनपाल श्री. सुरेश आत्माराम उपारे आणि श्री. रामदास दत्तात्रय खोत यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. तसेच वनसंरक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एका वनरक्षकास रजत पदक जाहीर झाले आहे.
या पदकांसाठी निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पडली. अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, तांत्रिक कौशल्य आणि प्रत्यक्ष कामगिरीची सखोल छाननी करून अंतिम निवड निश्चित केली.
सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीतल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राज्यातील एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, वनविस्तार आदी सहा विविध क्षेत्रांमध्ये हे सन्मान प्रदान करण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील या मानकऱ्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या कामगिरीची नोंद सेवापुस्तकात करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. या सन्मानामुळे वनसेवेत कार्यरत इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

