( छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था )
अभिजीत दिपके हे पार्टीच्या नावाखाली खासगी कंपनी चालवत असल्याचा आरोप करत गुजरातमधील दोन आंदोलकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’मध्ये देशभरातील आंदोलकांना योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप करत भविष्यात ‘कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रॅटिक’ ही स्वतंत्र संघटना सुरू करून देशभरातील आंदोलकांना एकत्र आणणार असल्याची घोषणा मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी केली.
गुजरातमधील राहुल पांड्या आणि मनीष ब्रह्मभट यांनी ६ ऑगस्ट रोजी अभिजीत दिपके यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारत दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. सलग तीन दिवस आंदोलन केल्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची बैठक झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. या बैठकीत अभिजीत दिपके यांचे मित्र आणि नातेवाईक यांनाच पदे देण्यात आल्याचा आरोप करत देशभरातील आंदोलनात सहभागी झालेल्या इतर कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान का देण्यात आले नाही, असा सवाल मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी उपस्थित केला.
‘आंदोलनात लाठ्या खाल्ल्या, मग पदे कुणाला?’
दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनात देशातील अनेक विद्यार्थी आणि समाजसेवक सहभागी झाले होते. मात्र, आंदोलनाचे योग्य नियोजन न झाल्याने अनेक आंदोलकांना पोलिसांच्या लाठीचार्जला सामोरे जावे लागले, असा दावा दोन्ही आंदोलकांनी केला. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीत स्थान मिळायला हवे होते. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या आणि पोलिसांच्या लाठ्या खाल्लेल्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याचा आरोप त्यांनी केला.
संघटना एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नव्हे, तर त्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर उभी राहिली पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. दिल्लीमध्ये आंदोलनातील सहकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, या बैठकीला जाऊन संघटनेच्या रचनेबाबत अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे मनीष ब्रह्मभट यांनी सांगितले.
‘इतर आंदोलनांमध्ये का सहभागी होत नाही?’
दिल्लीतील आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत अभिजीत दिपके यांच्या आम आदमी पक्षातील आणि खासगी आयुष्यातील मित्रांचाच समावेश कसा झाला, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. आंदोलन हे केवळ काही व्यक्तींनी केलेले नव्हते. देशाच्या विविध राज्यांमधून अनेक विद्यार्थी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. अनेकांनी पोलिसांचा लाठीचार्ज सहन केला. त्यामुळे संघटनेत पदे देताना या आंदोलकांचा विचार का करण्यात आला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सध्या झारखंडमध्ये आंदोलन सुरू असून, तिथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या जाहीर केलेल्या १२ पदाधिकाऱ्यांपैकी एकही व्यक्ती का सहभागी झाली नाही, असा सवालही आंदोलकांनी केला. अभिजीत दिपके आजारी असल्याचे सांगितले जात असले तरी इतर पदाधिकारी आंदोलनात सहभागी का होत नाहीत, असा प्रश्न मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे उभे राहण्याची भूमिका संघटनेने घ्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांच्या मते, या महत्त्वाच्या कोअर कमिटीमध्ये केवळ जुने मित्र, कॉलेजमधील सवंगडी आणि नेत्यांच्या गाड्यांच्या आजूबाजूला कायम फिरणाऱ्या किंवा केवळ त्यांची मर्जी राखणाऱ्या आणि पाणी पाजणाऱ्या लोकांनाच मानाचे स्थान देण्यात आले आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, नेत्यांनी एकमेकांच्या मैत्रिणींना (गर्लफ्रेंड्सना) या कमिटीमध्ये परस्पर सामावून घेतले आहे. यासोबतच राजकीय हेतूने प्रेरित होऊन आम आदमी पार्टी शी संबंधित अनेक चेहरे देखील या कमिटीमध्ये घुसडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “देशातील जनता आणि संघर्ष करणारा तरुण वर्ग अशा गर्लफ्रेंड्सचे नेतृत्व कधीही स्वीकारणार का ?” असा सणसणीत आणि बोचरा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत नेतृत्वाला उघडे पाडले आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रॅटिक’ची घोषणा
‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही काही मोजक्या लोकांची मर्यादित कंपनी नसून, आंदोलनातून उभी राहिलेली संघटना आहे. त्यामुळे संघटनेतील निर्णयांबाबत आम्ही प्रश्न विचारणारच, अशी भूमिका मनीष ब्रह्मभट यांनी मांडली.
केंद्र सरकारला जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला असेल, तर आमच्या प्रयत्नांतून उभी राहिलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही जाब विचारू, असे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत दिपके यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नसल्याचा आरोप करत, आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही तोपर्यंत प्रश्न विचारणे सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
यापुढे ‘कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रॅटिक’ ही स्वतंत्र संघटना उभारून देशभरातील आंदोलकांना त्यात सहभागी करून घेणार असल्याची घोषणा मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी केली. त्यामुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या संघटनात्मक रचनेवरून निर्माण झालेला वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

