(संगमेश्वर / एजाज पटेल)
घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेले दीपक शांताराम गोणबरे (४५, रा. उक्षी-भेळी चिंचपार) पुन्हा घरी परततील, या आशेवर असलेल्या त्यांच्या कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दीपक यांचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या ‘पवार कोंड’ परिसरात मंगळवारी सायंकाळी तरंगताना आढळला. या बातमीने उक्षी आणि करबुडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नीची ती साद अधुरीच राहिली…
दीपक गोणबरे घरातून अचानक निघून गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सौ. दिक्षा दीपक गोणबरे यांनी २२ मार्च रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीचा शोध घेण्याची विनंती केली होती. “ते नक्की परत येतील,” ही आशा उराशी बाळगून संपूर्ण कुटुंब त्यांची वाट पाहत होते. मात्र, दोन दिवसांनंतर आलेल्या या बातमीने कुटुंबाचा आधारच हिरावून घेतला असून, त्यांचा हंबरडा पाहून उपस्थित ग्रामस्थांचेही डोळे पाणावले.
गावकऱ्यांच्या एकजुटीला आले अपयश
आपल्या गावातील एक तरुण बेपत्ता झाल्याने उक्षी गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी झोप उडाली होती. पोलीस पाटील अनिल जाधव यांच्यासोबत जुनेद खान, भागेश जाधव, दुर्गेश जाधव, संदीप जाधव, मनोहर गोणबरे, संतोष देवळेकर, युसूफ हमदारे, असिर हमदारे, मुकद्दस काझी, मुदस्सिर काझी आणि मुझम्मील काझी या तरुणांनी जीवाचे रान केले. भर उन्हात डोंगर-दऱ्या तुडवल्या, बावनदीच्या खोल पात्रात होडीच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून शोधमोहीम राबवली. मात्र, निसर्गाचा खेळ वेगळाच होता.
दुर्दैवी शेवट
मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजता करबुडे येथील नदीपात्रात मृतदेह तरंगताना दिसताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नेते अब्दुल मुनाफ खतीब, रवींद्र जाधव, माजी सरपंच मिलिंद खानविलकर, करबुडे पोलीस पाटील हरीश वेदरे यांनी तातडीने धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटताच सर्वांनाच धक्का बसला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय कार्यवाहीसाठी विशेष सहकार्य केले.
दीपक गोणबरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन लहान मुलगे, वृद्ध आई-वडील, भाऊ, वहिनी आणि पुतणी असा मोठा परिवार उघड्यावर पडला आहे. एका कर्तव्यदक्ष कुटुंबप्रमुखाच्या अशा जाण्याने शोकाकुल उक्षी गावात कोणत्याही घरात काल चूल पेटली नाही.

