(साखरपा)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेली वाहतूक अखेर पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल आणि तांत्रिक पथकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला असून अनेक तास अडकून पडलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आंबा घाटात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या अपघातात चालक महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅसगळती होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने तत्काळ आंबा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल, महामार्ग विभाग तसेच संबंधित तांत्रिक पथके तातडीने दाखल झाली. अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. रात्रभर अत्यंत दक्षतेने आणि सुरक्षेच्या कडक उपाययोजनांमध्ये हे काम सुरू होते.
टँकरमधील गॅस पूर्णपणे सुरक्षितपणे हलविल्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत आंबा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोकण आणि कोल्हापूरदरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संपूर्ण कारवाईदरम्यान प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

