(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या चर्मालय चौक ते क्रांतीनगर, कोकणनगर आणि कीर्ती नगरपर्यंतच्या प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी रत्नागिरी नगरपालिकेकडे निवेदन सादर करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. या रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी वर्ग त्रस्त झाला असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शहरातून विमानतळ, औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील अनेक गावांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून ये-जा असते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरील खोल खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि असमतल पृष्ठभाग यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. अनेक वाहनचालकांना गती कमी करून कसाबसा मार्ग काढावा लागत असून प्रवाशांना बसणारे तीव्र धक्के सहन करावे लागत आहेत.
चर्मालय ते कोकणनगर हा मार्ग शाळकरी मुले, कार्यालयीन कर्मचारी, वृद्ध नागरिक तसेच रुग्णवाहिकांसाठी दैनंदिन वापराचा असल्याने परिस्थिती अधिक गंभीर मानली जात आहे. काही ठिकाणी खड्डे इतके खोल झाले आहेत की ते अक्षरशः जीवघेणे सापळे ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशअभावी हा धोका अधिकच वाढत असल्याने प्रशासनाने एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच जागे व्हावे, अशी मागणी पुढे येत आहे.
नौसीन काझी यांनी पालिका प्रशासनासमोर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर मी स्वखर्चाने हे काम करीन; मी स्वखर्चाने करू शकतो, तर आपल्याकडे सर्व यंत्रणा असून प्रशासन का करू शकत नाही?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्येही प्रशासनाविषयीचा रोष पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी गारवे यांनी संबंधित रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते एजाज इबजी उपस्थित होते.

