(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवर उघडकीस आलेल्या देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला अखेर सहा महिन्यांच्या फरारीनंतर दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय, रत्नागिरी यांनी सलमान नजमुद्दीन मुकादम (३०, रा. मिरकरवाडा) याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
१३ मे २०२५ रोजी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी खेडशी येथील एका लॉजवर छापा टाकून देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत अरमान खान यास अटक करण्यात आली होती, तर सलमान मुकादम व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. अरमान आणि इतर आरोपींना जामीन मिळाल्यानंतर सलमान हा पोलिसांच्या अटकेपासून बचावासाठी फरार झाला होता. त्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सलमानच्या वतीने बचाव पक्षाने त्याला नाहक गुन्ह्यात ओढले असून, तपास पूर्ण झाल्याने त्याच्या ताब्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद केला. तर सरकारी पक्षाने, सलमान हा गुन्ह्यात थेट सहभागी असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी अपहरणाचे प्रकरणही सुरू आहे, असे सांगत जामिनाला तीव्र विरोध दर्शविला.
न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले की, तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या चारही महिलांनी जबाबात “त्या स्वेच्छेने या व्यवसायात सहभागी असल्याचे” सांगितले आहे. तसेच जबरदस्ती अथवा बळजबरीचे कोणतेही पुरावे न आढळल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सहआरोपींनाही यापूर्वी जामीन मंजूर झालेला असल्याने सलमानच्या कोठडीची आवश्यकता उरलेली नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या आदेशामुळे सहा महिन्यांपासून फरारी असलेल्या सलमान मुकादमला कायदेशीर दिलासा मिळाला असून, प्रकरणाचा पुढील न्यायप्रविष्ट टप्पा आता न्यायालयातच उलगडणार आहे.

