(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात पाचल बाजारपेठेतून जाणाऱ्या राज्य मार्ग पावस ते विठापेठ क्र. १५५ वर सातत्याने वाहतुकीचा ताण वाढत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पाचल बाजारपेठेतील अरुंद रस्ता, वाढलेली वाहने, तसेच स्थानिक पातळीवरील काही अडचणींमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून तासन्तास वाहतूक ठप्प होते. याचा फटका केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही बसत असून त्यांना चालणेही कठीण होत आहे.
तसेच, रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी खासगी वाहने, वाढते अतिक्रमण आणि काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच विक्रीसाठी मांडलेले साहित्य यामुळेही परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पाचल बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन जागरूक नागरिक तुषार पाचलकर व समीर जनार्दन खानविलकर यांच्याकडून देण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी राजापूर, तहसीलदार राजापूर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी (उत्तर विभाग) यांनाही रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान, या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

