(रत्नागिरी)
तालुक्यातील शाळा रानपाट येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री. सुहास भितळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघ रानपाटचे अध्यक्ष श्री. मयूर मुरलीधर गोनबरे यांनी यशस्वी घौडदौड सुरू करून माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले. त्याप्रमाणे सदर मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याला रत्नागिरी पंचायत समितीचे नूतन सभापती श्री. प्रवीण पांचाळ आणि रत्नागिरी डाएटच्या वरीष्ठ अधिव्याख्याता सौ. दीपा सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलन व थोर नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. त्यानंतर उपस्थितांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार आणि स्वागत करण्यात आला. श्री. प्रवीण पांचाळ यांचा शाल व श्रीफळ देऊन अध्यक्ष श्री. मयूर गोनबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन केलेल्या या दिमाखदार सोहळ्यात सभापती श्री. प्रवीण पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समस्त रानपाट वासियांना एकत्र येऊन मेळावा सादर केल्याबद्दल धन्यवाद देत शाळेच्या दुरुस्तीसाठी तीन लाख रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. तसेच शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असू अशी ग्वाही दिली.
डाएट अधिव्याख्याता सावंत मॅडम यांनी मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. माजी विद्यार्थ्यांच्या विचारातील देवाण घेवाणीतून अनेक समस्या सोडवता येऊ शकतात हे लक्षात आणून दिले. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आणि एकंदर उत्साही वातरणाबाबत समाधान व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. मयूर गोनबरे यांनी संघ स्थापनेचा उद्देश समजावून देताना शाळेच्या आवश्यक भौतिक सुविधांच्या गरजांची माहिती दिली. त्यानुसार “जय महाराष्ट्र कला पथक रानपाट” कडून शाळेला 43 इंची स्मार्ट टी. व्ही. देणगी जाहीर करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांमधून श्री. प्रकाश मोर्यें आणि श्री. प्रदीप गोनबरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. सौ. प्रणाली गोनबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टरीत्या श्री. सुनील सखाराम गोनबरे माजी विद्यार्थी तथा पोलीस पाटील यांनी केले.

