(जाकादेवी / संतोष पवार)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत जाकादेवी येथील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत ३ सुवर्णपदक मिळवून या ३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यासह विविध स्तरातून या स्पर्धकांचे अभिनंदन होत आहे.
विभागीय स्पर्धा कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज दिशा इंग्लिश मिडियम स्कूल पेठ वडगाव येथे संपन्न झाल्या. या विभागीय स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील ६६ किलो वजनी गटातून तन्मय विजय घाणेकर, ५३ किलो वजनी गटातून धिरज दिलीप मायंगडे, ६६ किलो वजनी गटातून संकेत गणेश धामणे या तीन स्पर्धकांनी मोठ्या हिमतीने सुवर्णपदकाची कमाई करून शाळा व संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.
याच कनिष्ठ महाविद्यालयातील हर्ष गणेश सनगरे आणि अमन प्रदीप पाचकुडे या दोन स्पर्धकांनी सिल्वर पदक संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजचे क्रीडाशिक्षक संतोष सनगरे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले, तर मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे उपक्रमशील व धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे,मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ यांची उचित प्रेरणा मिळाली. गतवर्षी याच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली होती. यावर्षी पॉवर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभागीय स्तरावर मजल मारून तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मालगुंड एज्युकेशन सोसायटी, तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय तसेच जिल्हा क्रीडा विभागातून या स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पॉवरलिफ्टिंग राज्यस्तरीय स्पर्धा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सातारा येथे होणार आहेत.

