(तरवळ / अमित जाधव)
मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार, कवी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
दि. २४ मार्च रोजी कवी केशवसुत स्मारक येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या कर्णिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी दशेत असताना साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकाचा आपल्या मनावर खोल प्रभाव पडल्याचे त्यांनी सांगितले.
“मी शालेय जीवनात एक सामान्य विद्यार्थी होतो; मात्र साहित्य क्षेत्राने मला आयुष्यात खूप काही दिले,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकाने ‘कवीची नजर’ विकसित करावी, असे आवर्जून सांगितले. “जे न देखे रवी, ते देखे कवी,” या उक्तीचा उल्लेख करत त्यांनी दृष्टी आणि नजर यातील फरक समजून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
सध्याच्या यांत्रिक बुद्धिमत्तेच्या युगातही माणसाचे महत्त्व अबाधित असल्याचे त्यांनी सांगितले. “यंत्र कधीही माणसाचा पर्याय होऊ शकत नाही. शरीरावरील मळ आपण साफ करू शकतो; पण मनावरचा मळ कधीच पुसता येत नाही. त्यामुळे मन नेहमी स्वच्छ ठेवा, चांगले शिक्षण घ्या आणि चांगले विचार आत्मसात करा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपण केशवसुत यांच्या भूमीत जन्मलो, हे आपले भाग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. ९६ वर्षांच्या वयातही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या वाणीतील उत्साह आणि ऊर्जा लक्षवेधी होती.
या कार्यक्रमावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुनील ऊर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते कर्णिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन उर्फ आबा पाटील, ज्येष्ठ कवी डॉ. प्रदीप ढवळ, दीपा ठाणेकर, मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक अमित जाधव यांनी केले.

