(शिर्डी)
सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा 3’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला एक नव्या धमाकेदार गाण्यासह येत आहे. ‘आली रे आली गुलाबाची कळी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे या गाण्याचं लोकार्पण शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात आशीर्वाद घेऊन करण्यात आलं. गाण्याचं चित्रीकरण बबली या बोल्ड, बिनधास्त आणि ग्लॅमरस व्यक्तिरेखेवर केंद्रित असून, तिच्या दिलखेचक अदा आणि स्टाइलने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेलं हे गाणं पंकज पडघन यांच्या ठसकेबाज संगीताने सजले आहे. सचिन पाठक (Yo) यांनी लिहिलेल्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलं आहे.
“बबलीचा स्वॅग, प्रेक्षकांच्या मनात जागा”
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या चित्रपटात प्रत्येक पात्राची स्वतःची ओळख आहे. त्यात बबली खास ठरते. ‘आली रे आली गुलाबाची कळी’ हे तिच्या स्वॅगचं प्रतीक आहे.” तर संगीतकार पंकज पडघन म्हणतात, “बबली या व्यक्तिरेखेला आधीच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे या गाण्यातही तिच्या कॅरॅक्टरप्रमाणेच ताकद आणि आकर्षण असणं आवश्यक होतं. बोल, आवाज, संगीत आणि नृत्य यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन झाल्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल.”
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मिती, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स, तसेच वर्डविझार्ड एंटरटेनमेंट यांच्या सहनिर्मित या चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन आणि गिरीधर धुमाळ आहेत, तर सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. जय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा भरणा आहे – संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात आणि जयवंत वाडकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘येरे येरे पैसा 3’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १८ जुलै २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.