(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम गंजल लोढी (वय ५८, तरवळफाटा, मूळ रहिवासी, ता. बांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश,) हे घरी असताना अचानक रक्ताची उलटी होऊन खाली कोसळले. त्याचवेळी त्यांच्या नाक व तोंडातूनही रक्तस्त्राव सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना जाकादेवी ग्रामीण रुग्णालयात हलविले.
तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी तातडीने रत्नागिरीशासकीय रुग्णालय येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २३ मार्च रोजी पहाटे १२.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद आमृ. क्रमांक २०/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

