बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल हीने ‘कहो ना… प्यार है’ आणि ‘गदर: एक प्रेम कथा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. सौंदर्य, अभिनय आणि मोहक व्यक्तिमत्वामुळे तिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. व्यावसायिक आयुष्यात ती सतत चर्चेत असते, मात्र वैयक्तिक आयुष्याबाबत मात्र अमीषा नेहमीच शांत आणि पूर्णपणे खाजगी राहिली आहे. आज वयाच्या 50 व्या वर्षीही ती अविवाहित आहे आणि याबद्दल लोकांमध्ये नेहमीच कुतूहल असतं.
अलीकडेच अमीषाने रणवीर इलाहाबादिया यांच्या लोकप्रिय पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तिने काही वैयक्तिक गोष्टी उघड करताच ती पुन्हा चर्चेत आली आहे.
“टॉम क्रूजवर कायम क्रश आहे”
पॉडकास्टदरम्यान अमीषाने आपल्या क्रश बद्दल बोलताना सांगितले की, “मला टॉम क्रूजवर शालेय जीवनापासूनच क्रश आहे. माझ्या पेनसिल बॉक्सपासून रूममधल्या पोस्टरपर्यंत सगळीकडे त्याचे फोटो होते. आजही मी मजेत म्हणते की, टॉम क्रूज हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्यासाठी मी माझे नियम बाजूला ठेवू शकते. त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. जर कुणी विचारलं की मी त्याच्यासोबत “वन नाईट स्टँड” करू शकते का? तर माझं उत्तर ‘होय’ असंच असेल.” तिने पुढे हसत रणवीरला म्हटलं की, “जर तू टॉम क्रूजला कधी पॉडकास्टवर बोलावलं, तर मला नक्की आमंत्रित कर.” या विधानानंतर अमीषाच्या स्पष्टवक्तेपणावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

भूतकाळातील नातेसंबंधावर खुलासा
यावेळी अमीषाने पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक नातेसंबंधावर भाष्य केलं. तिने सांगितलं की, “फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी मी एका नात्यात होते. मात्र माझा जोडीदार मी सार्वजनिक आयुष्यात दिसावं हे पसंत करत नव्हता. त्याला हवं होतं की मी प्रकाशझोतातून दूर राहावं. पण मला अभिनय क्षेत्रात करिअर घडवायचं होतं. त्यामुळे शेवटी मी प्रेमाऐवजी करिअरची निवड केली.”
अभिनय प्रवास आणि यश
अमीषाने 2000 साली हृतिक रोशनसोबत ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला आणि तिला एकाच झटक्यात स्टारडम मिळालं. त्यानंतर आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाने तर तिचं आयुष्यच बदलून टाकलं. या चित्रपटात तिच्या अभिनयाला मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली आणि ती घराघरात पोहोचली.
यानंतर अमीषाने ‘हमराज’, ‘ये है जलवा’, ‘वादा’, ‘ऐलान’, ‘मेरे जीवन साथी’, ‘आप की खातिर’, ‘भूल भुलैया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अलीकडेच आलेल्या ‘गदर 2’ मधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यात यशस्वी ठरली.
सोशल मीडियावर लोकप्रियता कायम
अमीषा पटेल स्वतःचं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवते, तरी तिच्या धाडसी विधानांमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असून ती नेहमीच फॅन्ससोबत संवाद साधत असते.

