(मुंबई)
गेली एक संपूर्ण दशक मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि घराघरांत हास्याची लाट निर्माण करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रंगतदार स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सध्या दाखवले जात असलेले प्रोमो आणि सोशल मीडियावरील चर्चांमुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
कार्यक्रमाची पुनरागमनाची तयारी
मागील काही पर्वांमध्ये सारखेपणा आणि कंटाळवाणेपणा आल्यामुळे वाहिनीने या कार्यक्रमाला काही काळासाठी विश्रांती दिली होती. मात्र आता हा कार्यक्रम नव्या संकल्पनेसह, नव्या चेहऱ्यांसह आणि नव्या जोशात पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या या नव्या पर्वासाठी ऑडिशन्स सुरू असून, नवोदित कलाकारांनाही यात संधी मिळणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
सूत्रसंचालक बदलेल?
या नव्या पर्वाबाबत सर्वात मोठी उत्सुकता म्हणजे – ‘सुत्रसंचालक कोण?’ या कार्यक्रमाचा चेहरा मानला गेलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून सूत्रसंचालन करणारे डॉ. निलेश साबळे यांनी अलीकडेच कलर्स मराठीवरील ‘हसताय ना… हसलंच पाहिजे’ या कार्यक्रमातून नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे झी मराठी आणि निलेश साबळे यांच्यात वाद निर्माण झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर, नवीन पर्वात सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजित खांडकेकर याच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अभिजित खांडकेकर नवा सूत्रधार?
अभिजित खांडकेकर हा नावाजलेला अभिनेता आणि प्रेक्षकप्रिय सूत्रसंचालक असून, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. विविध पुरस्कार सोहळे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन यामुळेही त्याला मजबूत ओळख मिळाली आहे. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वासाठी तो योग्य पर्याय ठरू शकतो, असं अनेकांचं मत आहे. तथापि, झी मराठीकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे अंतिम निर्णयाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.
या कार्यक्रमाच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे. नव्या पर्वात नेमके कोणते कलाकार असतील? नवे फॉरमॅट काय असेल? सूत्रसंचालन कोण करणार? या साऱ्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

