(बंगळुरू)
महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या अपघातामागे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी बंगळुरूमध्ये Zero FIR दाखल केली आहे. ही तक्रार ‘हाय ग्राउंड्स पोलीस ठाणे’ येथे नोंदवण्यात आली आहे.
तक्रारीतील धक्कादायक आरोप
रोहित पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड नसून एक नियोजित कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अहवालातील निष्कर्षांचा आधार घेत त्यांनी अनेक गंभीर मुद्दे मांडले आहेत.
- संबंधित विमान उड्डाणासाठी अयोग्य असल्याचा दावा
- इंजिनची कार्यमर्यादा संपत असतानाही व्यावसायिक वापर
- उड्डाण तास (flight hours) कमी दाखवून नोंदींमध्ये फेरफार
- प्रत्यक्षात विमानाने 8000 तासांहून अधिक उड्डाण केल्याचा आरोप
तसेच, मुख्य वैमानिक सुमित कपूर याच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तो मद्यपी असून त्याचा परवाना यापूर्वी निलंबित करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
लँडिंगवेळी नियमांचा भंग?
तक्रारीनुसार, विमान उतरताना आवश्यक असलेली किमान 5 किमी दृश्यमानता नसतानाही केवळ 2-3 किमी व्हिजिबिलिटीमध्ये लँडिंगला परवानगी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर सुरक्षित धावपट्टीऐवजी शेवटच्या क्षणी धोकादायक ‘टेबलटॉप’ रनवेचा वापर करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
अपघाताच्या आधी सह-वैमानिकाने घाबरून प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जाते, मात्र मुख्य वैमानिकाकडून कोणताही आपत्कालीन संदेश देण्यात आला नाही. यामुळे तो मद्यधुंद अवस्थेत होता किंवा जाणीवपूर्वक मौन बाळगले, असा संशय उपस्थित केला जात आहे.
Zero FIR का?
रोहित पवार यांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही ठिकाणी तक्रार स्वीकारली गेली नाही. यापूर्वी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच 26 फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. मात्र, एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. त्यानंतर पुणे सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बंगळुरू येथील पोलीस ठाण्यात जाऊन Zero FIR नोंदवली.
दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे जाणारे विमान कोसळले होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता केवळ तांत्रिक चौकशी न करता सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. FIR नोंदवल्यानंतर तपास यंत्रणांकडून पुढील कारवाईकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

