( मुंबई )
चित्रपटसृष्टीसाठी बहुप्रतीक्षित असलेली 98वी अकादमी पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाली असून यंदाच्या ऑस्कर शर्यतीत भारताच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. भारताची अधिकृत प्रवेशिका असलेला नीरज घायवान दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित ‘होमबाऊंड’ हा चित्रपट ऑस्कर 2026 च्या नामांकन शर्यतीतून बाहेर पडला आहे.
‘होमबाऊंड’मध्ये ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ या श्रेणीत अंतिम नामांकनासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र नामांकन जाहीर झाल्यानंतर भारतीय प्रेक्षकांची मोठी अपेक्षा अपूर्ण राहिली आहे.
यंदा भारताकडून ‘होमबाऊंड’सह ‘कांतारा: चॅप्टर 1’, ‘तन्वी द ग्रेट’, ‘महावतार नरसिंह’ आणि ‘टूरिस्ट फॅमिली’ हे चित्रपट ऑस्कर शर्यतीत होते. मात्र अंतिम यादीत भारताचा एकही चित्रपट स्थान मिळवू शकलेला नाही. 2026च्या ऑस्कर नामांकनांबद्दल उत्सुकता अनेकांना होती. भारतातून आणखी काही चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते, ज्यांची नावे ‘दशवतार’, ‘तन्वी द ग्रेट’, ‘महावतार नरसिंह’ आणि ‘कांतारा चॅप्टर 1’ होते. दरम्यान ‘दशवतार’ हा चांगला चित्रपट मराठी आहे. याशिवाय ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ याने चित्रपट प्रमुख श्रेणींमध्ये वर्चस्व गाजवले आहे. हा चित्रपट निर्माता पॉल थॉमस अँडरसन यांचा असून या वर्षीच्या सर्वात प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात होता. मात्र भारताच्या पदरी निराशा आली आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळा 15 मार्च 2026 रोजी पार पडणार असून, नामांकनांची घोषणा गुरुवारी 22 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता करण्यात आली. ही घोषणा Oscar.com आणि Oscar.org वर थेट प्रक्षेपित करण्यात आली होती. तसेच फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरही हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात आला.
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर नामांकनांमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळतो आहे. ‘बुगोनिया’, ‘मार्टी सुप्रीम’, ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’, ‘सिनर्स’ आणि ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ यांसारख्या चित्रपटांनी विविध प्रमुख श्रेणींमध्ये स्थान पटकावले आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत नामांकन:
बुगोनिया, एफ1, फ्रँकेन्स्टाईन, हॅमनेट, मार्टी सुप्रीम, वन बॅटल आफ्टर अनदर, द सीक्रेट एजंट, सेंटिमेंटल व्हॅल्यू, सिनर्स, ट्रेन ड्रीम्स.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:
पॉल थॉमस अँडरसन, रयान कूगलर, जोश सफ्डी, जोआकिम ट्रायर, क्लोई झाओ.
सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री, तांत्रिक आणि इतर श्रेणींमध्येही अनेक दिग्गज कलाकार आणि चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘द सीक्रेट एजंट’ (ब्राझील), ‘सेंटीमेंटल व्हॅल्यू’ (नॉर्वे) आणि ‘सिरात’ (स्पेन) यांसारख्या चित्रपटांनी ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीत स्थान मिळवले आहे.
भारतासाठी यंदाचा ऑस्कर हंगाम अपेक्षाभंग करणारा ठरला असला, तरी जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील चुरस अधिक रंगतदार झाल्याचं चित्र आहे. आता 15 मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याकडे जगभरातील चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

