(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील मिऱ्या – नागपूर महामार्गावरील जे. के. फाईल कार्यालयासमोरील पुलाजवळ सुरू असलेल्या कामाच्या परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक किरकोळ जखमी झाला. धडक दिल्यानंतर संबंधित चारचाकी वाहनचालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाल्याने त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चंद्रकांत खेत्री (वय २५, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) हे त्यांच्या ताब्यातील एक्सेस दुचाकी (एमएच ०८ बीएच ६२६०) घेऊन रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जे. के. फाईल बसस्टॉपच्या अलीकडील पुलाजवळ, जिथे सध्या काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाला आहे, तेथे समोरून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
या धडकेत सचिन खेत्री यांच्या डोक्याच्या मागील भागाला मार लागला असून डाव्या डोळ्याजवळ, डाव्या हाताला तसेच दोन्ही पायांना खरचटून किरकोळ दुखापत झाली. धडक दिल्यानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन व त्यावरील चालकाविरुद्ध गु.र. नं. ७६/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४, १३४(ब), १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची नोंद रविवारी पहाटे ३.०७ वाजता करण्यात आली असून पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.
मूलभूत सुरक्षाव्यवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष
रत्नागिरीत सुरू असलेल्या कामांदरम्यान पुन्हा एकदा ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित कामाचा ठेका सांभाळणाऱ्या रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीकडून मूलभूत सुरक्षाव्यवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक इशारा फलक, परावर्तित चिन्हे, रात्री पुरेशी प्रकाशयोजना किंवा वाहतूक नियंत्रणाची स्पष्ट व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. विशेषतः पुलाजवळ किंवा अरुंद मार्गांवर काम सुरू असताना सुरक्षिततेचे निकष काटेकोरपणे पाळणे अपेक्षित असते; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीवरही बोट ठेवले जात आहे.

