(रत्नागिरी)
जिल्ह्यासह कोकणात सध्या जाणवत असलेली कडक थंडी काजू उत्पादकांसाठी दिलासादायक ठरत आहे. थंडीचे वातावरण टिकून राहिल्यामुळे काजूच्या झाडांवर फुलोऱ्यानंतर काजू धरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली असून, यंदा काजूचे पीक चांगले येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
हवामानातील स्थिरता आणि कोरडे वातावरण यामुळे काजूच्या मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो. परिणामी फुलगळ कमी होत असून झाडांवर काजू व्यवस्थित धरू लागल्याचे चित्र अनेक बागांमध्ये दिसून येत आहे. थंडीमुळे किडींचा प्रादुर्भावही मर्यादित राहिल्याने काजू बागांची एकूण स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत अनियमित पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे काजू उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र यंदा डिसेंबरपासून जाणवणारी कडक थंडी काजू पिकासाठी पोषक ठरत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. झाडांना लागलेले काजू टिकून राहिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काजू हे कोकणातील महत्त्वाचे नगदी पीक असल्याने उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. सध्या बागांमध्ये काजू लागण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी पुढील काळात हवामानाची अनुकूल साथ कायम राहो, याकडे आशेने पाहत आहेत.

