(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील नाखरे येथील प्रसिद्ध श्री नवलादेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न देवस्थान समितीने केलेल्या सुरक्षात्मक उपायांमुळे अयशस्वी ठरला. मजबूत लोखंडी कवच असलेल्या दानपेटीमुळे चोरट्याला ती फोडण्यात अपयश आले आणि अखेर त्याला रिकाम्या हाताने माघार घ्यावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिर परिसरात प्रवेश करून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. हत्याराच्या सहाय्याने दानपेटीचे कुलूप व संरक्षक कवच उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, देवस्थान समितीने पूर्वी झालेल्या चोरीच्या प्रयत्नांचा अनुभव लक्षात घेऊन दानपेटीला मजबूत लोखंडी संरक्षण दिले असल्याने चोरट्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. या संदर्भात गावचे पोलिस पाटील सुधीर वाळिंबे यांनी सांगितले की, मंदिरात यापूर्वीही चोरीचे प्रयत्न झाल्यामुळे देवस्थान समितीने दानपेटीची रचना अधिक सुरक्षित केली होती. त्याच दूरदृष्टीचा फायदा या घटनेत झाला असून, दानपेटीचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही.
दरम्यान, मंदिरातील सुरक्षाव्यवस्थेचा एक भाग म्हणून दानपेटी नियमितपणे दर दोन महिन्यांनी उघडून त्यातील रक्कम बँकेत जमा करण्याची पद्धत अवलंबली जाते. नियोजनानुसार सोमवारीच दानपेटी उघडण्यात आली असून, त्यातील रक्कम सुरक्षितपणे बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीने दिली. या घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्याबाबत देवस्थान समिती विचार करत असून, धार्मिक स्थळांवरील चोरीचे प्रकार रोखण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

