(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संलग्न युवासेनेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे उघडकीस आलेल्या रॅगिंगप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनाकडे दोषी विद्यार्थ्यांवर अंतर्गत कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयातून बाहेर काढण्याची भूमिका नसली तरी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर शिस्तभंगात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन सादर करताना प्रसाद सावंत यांनी, “दोषींवर कारवाई न झाल्यास चुकीच्या वर्तनाला अप्रत्यक्ष पाठबळ मिळेल,” असा इशारा दिला. विद्यार्थ्यांच्या चुका झाकण्याचा प्रयत्न झाल्यास युवासेना आपल्या पद्धतीने पुढील भूमिका ठरवेल, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. या भेटीत युवासेना शहरप्रमुख आशिष चव्हाण तसेच नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे उपस्थित होते. निवेदनात महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणात आतापर्यंत कोणती कारवाई केली, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रॅगिंगचा त्रास सहन केलेल्या विद्यार्थ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसीय प्रक्रिया सुरू झाली असली, तरी महाविद्यालयाच्या अंतर्गत शिस्तपालन यंत्रणेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. दोषी विद्यार्थ्यांवर योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई झाली, तर भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकतो, असे मत युवासेनेने व्यक्त केले.
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील यांनी संबंधित प्रकरणाची महाविद्यालयीन समितीकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंची मते ऐकून दोन दिवसांत अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर महाविद्यालयीन स्तरावर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती प्रसाद सावंत यांनी दिली.

