( संगमेश्वर / प्रतिनिधी )
स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘रायझिंग स्टार’ हा राज्यस्तरीय पुरस्कार रूपाली महादेव पाटील यांना जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांनी पत्राद्वारे दिली आहे.
कलेची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक करवीर नगरीत (कोल्हापूर) हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. येत्या ता. ५ एप्रिल रोजी ताराराणी विद्यापीठातील व्ही. टी. पाटील सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्रभरातील कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने ठसा उमटवणाऱ्या गुणवंत कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
स्वराज्य युवा प्रतिष्ठान आणि ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रूपाली पाटील यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील कलाकारांच्या गुणांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

