(गावखडी / वार्ताहर)
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी (भूतेवाडी) येथील जागृत देवस्थान श्री भगवतीदेवीचा यात्रोत्सव शुक्रवार, 2 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
यात्रोत्सवाच्या दिवशी सकाळी देव्हाऱ्यात भगवतीदेवीचे मुखवटे धारण करून देव्हारा भक्तांच्या दर्शनासाठी मंडपात आणण्यात येणार असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे. यात्रोत्सवानिमित्त गुरुवार, 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, मनोरंजनात्मक व विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता भूतेवाडी महिलामंडळातर्फे हळदी-कुंकू समारंभ होणार असून भाग्यवान महिलेला देवीच्या मानाची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याच वेळी शालेय विद्यार्थ्यांना श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळातर्फे बक्षीस वितरण होणार आहे.
रात्री 8 वाजता क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल. त्यानंतर रात्री 12 वाजता भुतेवाडीतील भाऊबंदकीतर्फे श्री भगवतीदेवीचा पारंपरिक गोंधळ सादर केला जाणार आहे. रात्री 12.30 वाजता हिंदी चित्रपट ‘कांतारा-2’ दाखवण्यात येणार आहे. यात्रोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या यात्रोत्सवात पूजासाहित्य, देवीची ओटी, खेळणी, प्रसाद तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली जाणार असून यात्रेनिमित्त लक्षणीय आर्थिक उलाढाल होते.
नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भगवतीदेवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळ मेर्वी (भूतेवाडी) यांच्या वतीने अध्यक्ष हरिश्चंद्र भूते, उपाध्यक्ष दीपक भूते व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

