(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगत असलेल्या भाट्ये खाडीमुखाजवळ गाळ साचण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला असून, प्रत्यक्ष कृतीचा अभाव कायम आहे. या गाळामुळे मच्छीमारांची जीवघेणी कसरत वाढत असतानाही, शासन व प्रशासन गप्प का आहे? असा संतप्त सवाल मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.
काजळी नदीच्या खाडीमुखातून राजिवडा, कर्ला, भाट्ये, फणसोप, नवा फणसोप येथील शेकडो मच्छीमार आपापल्या नौकांमधून समुद्रात उतरत असतात. मात्र, खाडीमुखावर साचलेला गाळ आणि त्यातून तयार झालेला वाळूचा पट्टा यामुळे भरतीचा नेमका क्षण साधूनच नौका समुद्रात टाकावी लागते. याच दरम्यान गाळात अडकलेल्या किंवा उलटलेल्या काही नौकांच्या अपघातांत खलाशांचे बळीही गेले आहेत. तरीही आजवर गाळ उपशासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र कायम आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत मच्छीमारांनी पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्याकडे सातत्याने गाळ उपशाची मागणी लावून धरली. गाळ उपशासाठी प्रस्तावही पाठवण्यात आले; काही वेळा आश्वासनेही मिळाली. मात्र, प्रत्यक्ष उपसा अद्याप झाला नाही. या गाळामुळे नौकांना वापरला जाणारा जलमार्ग अरुंद होत चालला असून, राजिवडा-भाट्ये पुलाजवळूनच सॅण्डबार तयार होतो आहे. यामुळे लाखो क्युबिक मीटर गाळ हटवणे अपरिहार्य बनले आहे. विशेष म्हणजे, या भागात साचलेला गाळ इतक्या वर्षांचा असून, तो केवळ प्रगत ड्रेजरच्या साहाय्यानेच उपसता येऊ शकतो. परंतु ना ड्रेजर उपलब्ध, ना उपसाचे नियोजन – त्यामुळे नव्या मच्छीमारी हंगामाच्या उंबरठ्यावरही मच्छीमार पुन्हा एकदा अनिश्चिततेत उभे आहेत.
१ ऑगस्टपासून नव्या हंगामाला सुरुवात होत असून, नारळी पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष मच्छीमारीला गती मिळते. समुद्रही त्या काळात तुलनेने शांत असतो. परंतु, हाच काळ खाडीचा पुरेसा उपयोग करता न आल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी पसरली आहे. दरवर्षी आश्वासनांची पुनरावृत्ती होते, पण प्रत्यक्षात गाळ उपसा होत नाही. मग शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे फक्त ‘सहवेदना’च दर्शवत राहणार का? मच्छीमारांचा जीव धोक्यात घालूनच विकासाचे दावे पुढे नेले जाणार का? खऱ्या अर्थाने या समस्येची जबाबदारी कोण स्वीकारणार? भाट्ये खाडीतील गाळाचा हा जुना प्रश्न आणखी किती हंगाम अंधारातच ठेवला जाणार? असे एक नवे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.