(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
अमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करत “मेफेड्रोन” सदृश अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमाला रंगेहाथ पकडले आहे. आरोपीच्या ताब्यातून एकूण ५.२० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी, चिपळूण शहरातील खेर्डी M.I.D.C कडे जाणाऱ्या मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना एका “स्विफ्ट” कारमधील इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला. वाहन क्रमांक MH08-AG-0337 ची तपासणी केली असता, त्यामध्ये एक पिशवी मिळून आली ज्यात ९ ग्रॅम “मेफेड्रोन” सदृश अमली पदार्थ आढळून आला.
संशयित आरोपीचे नाव दीपक रंगलाल लीलारे (वय २४, रा. कावीळ तळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे असून, त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल ९ ग्रॅम अमली पदार्थ व “स्विफ्ट” चारचाकी वाहन जप्त केला आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी — स.पो.नि. विलास जाधव, पो.उप.नि. हर्षद हिंगे, पो.हवा. बाळू पालकर, विक्रम पाटील, प्रवीण खांबे, गणेश सावंत, वृक्षाल शेटकर, नीलेश शेलार व अतुल कांबळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली. या गुन्ह्याचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.