(सांगली)
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वंदना संतोष गायकवाड (वय ३८) आणि संतोष धोंडीराम गायकवाड (वय ४५, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. वंदना गायकवाड या कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होत्या.
ही घटना आज सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य MH-09-FJ-2815 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरमार्गे अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. शिरढोण गावाजवळील नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या MH-09-CJ-2671 क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि त्याच्या दोन ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कार ट्रॉलीखाली अडकली. या अपघातात कारमधील दोघेही गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडले. अपघातावेळी ट्रॅक्टर चालक व कामगार जवळील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते, अशी माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांचे स्वीय सहाय्यक अमोल कोरे यांच्या तत्परतेमुळे मृतांची ओळख पटविणे शक्य झाले. त्यांनी तात्काळ संपर्क साधल्याने पोलिसांच्या तपासाला मोठी मदत झाली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

