(रत्नागिरी)
युथबिल्ड फाऊंडेशन (YouthBuild Foundation) यांनी रत्नागिरी जिल्ह्यात IDBI Bank च्या ‘कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी’ (CSR) उपक्रमांतर्गत व्यापक व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. आदरातिथ्य (Hospitality), पर्यटन आणि सूक्ष्म-उद्योग या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देत स्थानिक युवक-युवती, महिला आणि इच्छुक व्यक्तींची रोजगारक्षमता तसेच उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत अशा अभ्यासक्रमांद्वारे प्रशिक्षणार्थींना पायाभूत ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि उपजीविकेच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत एकूण २४० प्रशिक्षणार्थींना आठ वेगवेगळ्या जॉब रोल्ससाठी प्रशिक्षित करण्यात आले. यामध्ये ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह’, ‘होमस्टे होस्ट’, ‘रेस्टॉरंट मॅनेजर’, ‘टूर गाईड’, ‘ट्रॅव्हल कन्सल्टंट’ यांसारख्या सेवा क्षेत्रातील संधींसह ‘बांबू उत्पादने निर्मिती’, ‘काजू प्रक्रिया’ आणि ‘फळ प्रक्रिया’ या उद्योजकता विकास (EDP) घटकांचाही समावेश होता.
या प्रशिक्षणाचा समारोप म्हणून प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम १८ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथे आयोजित करण्यात आला. प्रतीक मनवाणी (देवरूख शाखा) आणि प्रदीप पिसाळ (साखरपा शाखा) यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी युथबिल्ड फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री.अवधूत पावसकर यांनी प्रभावीपणे केली. या कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर कौशल्याधारित रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मोठी मदत होणार असून, युवक-युवतींना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी भक्कम पाया मिळाला आहे.

