(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील श्री चाफनाथ कृषी प्राईड शेतकरी गटाला दि प्राईड इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ६०% अनुदानावर कृषी उपयोगी अवजारे प्रदान करण्यात आली.
चाफवलीतील १३ शेतकऱ्यांनी मिळून हा गट स्थापन केला असून आत्मा योजनेमार्फत रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. त्यानंतर बँक खाते उघडून अवजारांच्या एकूण किमतीपैकी ४०% रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित ६०% रक्कम अनुदान स्वरूपात देऊन दि प्राईड इंडिया आणि एचडीएफसी बँक यांनी शेतीपूरक अवजारे पुरवली. यामध्ये नागरणी मशीन, ग्रास कटर, लाकूड कापण्याचे मशीन, पाणी पंप, फवारणी पंप, वीळ, फावडी, पीकाव, आंबे काढणीसाठी घळ (झेले), आंबा साठवणीसाठी क्रेट आदी साहित्याचा समावेश आहे.
हा गट स्थापन करण्यासाठी दि प्राईड इंडिया संस्थेचे चाफवली येथील समूह संघटक शुभम म्हेत्रे, तसेच सचिन रसाळ आणि ऋषिकेश कोकरे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच हस्ते ही अवजारे गटाला सुपूर्द करण्यात आली.
कार्यक्रमास चाफवलीतील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण चाळके, शशिकांत चाळके, गटाध्यक्ष संजय चाळके, उपाध्यक्ष प्रकाश चाळके, सचिव नितीन बाईंग, उपसरपंच विजय घुमे, पोलिस पाटील विजय चाळके, सुरेश चाळके, हरीश कांबळे, शांताराम गावडे, राजाराम लिगम, सुरेश बावदाने, संतोष बोडेकर, बाबू बोडेकर, प्रसाद पाटोळे, प्रज्योत चाळके, सदानंद पाटोळे तसेच महिला वर्गातील नेहा बाईंग, वसुधा चाळके, अरुणा पाटोळे, आरती चाळके, ग्रामस्थ व अवजारे पुरवणारे निकम उपस्थित होते.
यावेळी दि प्राईड इंडिया संस्थेचे सचिन रसाळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत गावात आणखी शेतकरी गट स्थापन करण्याचे आवाहन केले.

