(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील जे. एम. म्हात्रे कंपनीच्या क्रेशरवर काम करणाऱ्या सचिन सखाराम घोसाळकर या 53 वर्षीय कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (सोमवारी) सकाळी घडली. खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील सचिन घोसाळकर हा गेले पाच वर्ष क्रेशरवर सुपरवायझर म्हणून काम करत होता.
खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील सचिन सखाराम घोसाळकर वय वर्ष 53 हा गेले पाच वर्ष मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे आरवली ते तळेकांटे रस्त्याचे काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे कंपनीचे वांद्री येथील क्रेशरवर सुपरवायझर म्हणून नोकरी करत होता.
सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास नाश्ता केल्यानंतर तो रूममध्येच असताना अचानक त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्याने रूममधील सहकारी समीर शशिकांत सांडव याने व इतर कामगार लोकांनी 108 रुग्णवाहिकेने जवळच्या वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून अधिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार त्याच रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी डॉ. मोरे यांनी तपासून सचिन घोसाळकर चा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.
सचिन घोसाळकर च्या अचानक जाण्याने जे. एम. म्हात्रे कपंनी च्या कामगारातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कंपनीचे स्थानिक वरिष्ठ अधिकारी तसेच कामगारांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती. घडलेल्या घटनेची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

