(वॉशिंग्टन)
अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अमेरिका पुढील पाच दिवस इराणच्या वीज प्रकल्पांवर कोणतेही लष्करी हल्ले करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे आवश्यक असल्याची अटही त्यांनी घातली आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी इशारा देत म्हटले होते की, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर थेट हल्ले केले जातील. यासाठी त्यांनी 48 तासांची मुदतही दिली होती.
अमेरिका-इराण चर्चेला वेग, तणाव कमी होण्याची शक्यता
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराणमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेतून संघर्षावर व्यापक तोडगा निघण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभर ही चर्चा सुरू राहणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तुर्कीची मध्यस्थी, इराणकडून अधिकृत दुजोरा नाही
दरम्यान, इराणकडून या चर्चेबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तुर्कीचे समकक्ष हाकान फिदान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याचे सांगितले आहे. तुर्की याआधीही अमेरिका-इराण चर्चेत मध्यस्थीची भूमिका बजावत आले आहे. सोमवारी संयुक्त अरब अमिराती यांनी इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना रोखण्यासाठी आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केल्याची माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हल्ले स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर अधिक तणाव वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अमेरिका-इराण चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

