(रत्नागिरी)
तालुक्यातील बसणी गावात वीज पुरवठा खंडित होताच BSNLचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प होण्याच्या समस्येला अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या गंभीर प्रश्नाची दखल घेत युवासेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी संबंधित BSNL अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर भविष्यात बसणी गावात नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बसणी परिसरात वीज गेल्यानंतर मोबाईल टॉवरचा बॅकअप त्वरित संपत असल्याने संपर्क यंत्रणा पूर्णपणे खंडित होत होती. याचा फटका स्थानिक नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना बसत होता.
ही समस्या युवासेना उपविभाग प्रमुख आराध्य महेश नेवरेकर यांनी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने हालचाल करण्यात आली. सावंत यांनी BSNL अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ग्रामीण भागातील ग्राहकांना अखंडित सेवा मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आणि बॅकअप यंत्रणेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.
युवासेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत बसणीतील नेटवर्क सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. या पुढाकारामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून आराध्य नेवरेकर आणि प्रसाद सावंत यांचे आभार मानले जात आहेत.

