( रत्नागिरी )
कोरोना काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात आता कोकणवासीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ही गाडी तातडीने पूर्ववत सुरू न केल्यास महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश दसम यांनी दिला आहे.
गेल्या सुमारे ३० वर्षांपासून कोकणवासीयांची जीवनवाहिनी ठरलेली ही पॅसेंजर गाडी कोरोना काळात दादरऐवजी दिवा स्थानकावरून चालवण्यात येत होती. मात्र कोरोना महामारी संपल्यानंतरही ही सेवा पूर्ववत दादर-रत्नागिरी मार्गावर सुरू करण्यात आलेली नाही. यासंदर्भात प्रवासी संघटना व लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.
दादर हे मध्यवर्ती स्थानक असल्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ते अधिक सोयीचे ठरते. सध्या दिवा स्थानकावरून प्रवास करताना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक ही गाडी सुरू करत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
दरम्यान, उत्तर भारताकडे धावणाऱ्या नव्या गाड्यांना दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो; मात्र कोकणच्या या महत्त्वाच्या गाडीसाठी जागा नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने रेल्वे प्रशासनावर दुजाभावाचा आरोपही होत आहे.
महाराष्ट्र दिनापूर्वीच दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अन्यथा कोकणवासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस रेल्वे प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही सुरेश दसम यांनी दिला.
दरम्यान, कोकणवासीयांनी आता थेट कोकण रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

