(रत्नागिरी)
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित “रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव, 2025″ चे उद्घाटन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे हस्ते 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कुवारबाव येथे होणार आहे. सदर ग्रंथोत्सव कार्यक्रम 25 व 26 मार्च या दिवशी आयोजित करण्यात आला आहे.
लांजा येथील ज्येष्ठ साहित्यिक विलास कुवळेकर हे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील ग्रंथ प्रेमी, वाचक, अभ्यासक, संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
या साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद व काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोल्हापूर शाखा आणि पुण्यातील प्रकाशक व विक्रेते यांची ग्रंथ दालने लावण्यात येणार असून, या ग्रंथ प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी 25 मार्च रोजी पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या सुरुवातीस सकाळी 8.30 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथदिंडीचे उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या शुभहस्ते ग्रंथ पूजनाने होणार आहे. ग्रंथ दिंडीचा मार्ग मातोश्री कमलाबाई विसपुते, इंग्लिश मिडियम स्कूल येथून सामाजिक न्याय भवन मार्गे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय असा असेल. या ग्रंथ दिंडीत अनेक मान्यवर व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि ग्रंथ प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
बुधवार 25 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता “सर्जनशीलतेची गुरुकिल्ली : वाचन” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून राजापूर तालुक्यातील जेष्ठ साहित्यिक मदन हजेरी हे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष असून डी.जी.के. महाविद्यालयाच्या सह प्राध्यापक श्रीमती वसुंधरा जाधव आणि कोकण विभाग ग्रंथालय संघाचे संचालक राकेश आंबेरकर हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजता ‘अहिल्याबाई होळकर : स्त्री नेतृत्वाची अभिजात परंपरा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संचालक अभिजित हेगशेट्ये हे आहेत. साहित्यिक माधव अंकलगे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूण च्या संचालिका प्राची जोशी हे वक्ते सहभागी होणार आहेत.
गुरुवार 26 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी वर्ग, वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी “यशाच्या दिशेने : स्पर्धा परीक्षेची स्मार्ट तयारी” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी प्रवींद बिरादार आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे हे सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता निमंत्रित कवींचे काव्य संमेलन व त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होईल. जेष्ठ कवयित्री श्रीमती सुनेत्रा जोशी या काव्य संमेलनचे अध्यक्ष स्थानी असणार आहेत.
रत्नागिरी ग्रंथोत्सव – 2025 या शासकीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील वाचक प्रेमी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री स्टॉल आणि विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी केले आहे.

