( नवी दिल्ली )
राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक आणि संवेदनशील असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज सायंकाळी भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ उभी असलेल्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून सात ते आठ गाड्यांना आग लागली आहे. या घटनेत जवळपास 24 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
संध्याकाळी सुमारे 6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्फोट एवढा जबरदस्त होता की परिसरातील इमारती आणि दुकाने यांच्या काचा फुटल्या. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर येथे पार्किंग भागात असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला आणि या कार जळून खाक झाल्या.
प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर जवळ उभ्या असलेल्या इतर गाड्यांना आग लागली. आग इतकी तीव्र होती की काही काळ परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
हा स्फोट अपघाती होता की दहशतवादी कटाचा भाग, याबाबत तपास सुरू आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले असून, परिसर सील करण्यात आला आहे. लाल किल्ला परिसरातील वाढत्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.
या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी या व्यक्ती त्या कारच्या अगदी जवळ उभ्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेत जखमीना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

