(पणजी)
गोव्याचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांचे आज (बुधवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी पोंडा येथील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील एक प्रभावशाली आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जात. त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री आणि अनेकदा मंत्री म्हणून राज्याची सेवा केली. “नाईक यांच्या कार्याचा राज्याच्या प्रशासनावर आणि जनतेवर खोल ठसा उमटला आहे,” असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त करताना म्हटले. राज्य सरकारने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
भंडारी समाजाचे प्रमुख नेते म्हणून रवी नाईक यांनी समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवला. ‘कुल’ आणि ‘मुंडकार’ यांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे आंदोलन केले होते. गोव्यात तिसरा जिल्हा असावा, ही संकल्पना सर्वप्रथम त्यांनी मांडली होती.
१९९१ साली त्यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आणि जवळपास २८ महिने राज्याचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली होती. राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी फोंडा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून केली होती.
१९८४ मध्ये एम.जी.पी. पक्षाच्या तिकिटावर त्यांनी पोंडा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली. पुढे १९९८ मध्ये ते उत्तर गोव्याचे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.

