(राजापूर / तुषार पाचलकर)
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची १६वी शाखा रविवारी राजापूर तालुक्यातील पाचल येथे उत्साहात सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी बोलताना डॉ. शेट्ये यांनी पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, वैश्य समाजाचे संघटन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी मजबूत वित्तीय आधार आवश्यक आहे. ही गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था गेली ३४ वर्षे सातत्याने उल्लेखनीय काम करत आहे. छोट्या व मध्यम उद्योजकांना कर्जपुरवठा करून त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेमार्फत होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या संस्थेकडे सुमारे २०० कोटी रुपयांच्या ठेवी असून १२७ कोटी रुपयांचा कर्जव्यवहार सुरू आहे. संस्थेत अनेक कर्मचारी तसेच ७८ अल्पबचत प्रतिनिधी कार्यरत असून, भागभांडवलाच्या अनेक पटींनी गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सभासद व ठेवीदारांमध्ये संस्थेबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. गणपत वळंजू व संचालक मंडळाच्या पुढाकाराने संस्थेचा विस्तार केवळ सिंधुदुर्गपुरता मर्यादित न राहता कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतही करण्यात आला आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या धर्तीवर सर्व डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, स्थापनेपासून सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली ही पतसंस्था आता पाचल परिसरातील ठेवीदार, हितचिंतक आणि गरजू उद्योजकांसाठी भक्कम आधार ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. गणपत वळंजू, पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच बाबालाल फरास, जिल्हा परिषद सदस्या सौ. सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षाताई मासये व सौ. समीक्षा वाफेलकर, पाचल वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. किशोरभाई नारकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. अण्णा पाथरे, उपसरपंच आत्माराम सुतार, रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाचे सचिव श्री. नरेंद्र बेलवलकर, महिला उपाध्यक्षा सौ. शिवांगी प्रसादे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. कौस्तुभ भिंगार्डे, श्री. यशवंत पाडावे, श्री. कोळवणकर, श्री. विलास प्रसादे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अंधारे यांसह मलकापूर वैश्य समाजाचे माजी अध्यक्ष श्री. अण्णा बेर्डे, राजापूर तालुका विकास सेवा संघाचे मधुकर गोमणे, माजी जि.प. सदस्य आबा आडीवरेकर, श्री. विलास नारकर, श्री. उदय सक्रे, श्री. अनंत कोलते आणि ठाणे जिल्हा वैश्य समाज महिला अध्यक्षा सौ. नारकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन किशोरभाई नारकर यांनी मानले.

