(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेत महायुतीने सत्ता स्थापन केल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आता विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येत्या २५ मार्च रोजी चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी इच्छुक सदस्यांकडून पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंडणगड तालुक्याला संधी देण्यात आली, तर उपाध्यक्षपद संगमेश्वर तालुक्याकडे गेले. अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे आता विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर या तालुक्यांतील सदस्यांना संधी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतरचा हा पुढील महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने सभापतिपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्याच पातळीवर होणार असल्याने कोणीही उघडपणे दावा करताना दिसत नाही. तरीही काही इच्छुक सदस्यांनी मध्यस्थांच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षण व वित्त समिती, समाजकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच आरोग्य व बांधकाम समिती अशा पाच विषय समित्या कार्यरत आहेत. यापैकी चार समित्यांच्या सभापतिपदासाठी २५ मार्च रोजी निवडणूक होणार असून, प्रत्येक पदासाठी अनेक इच्छुक मैदानात असल्याचे दिसून येते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत पाच विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांना प्रतिनिधित्व देण्यात आले होते. खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघाला अध्यक्षपद, तर राजापूर-लांजा-संगमेश्वर मतदारसंघाला उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर आता उर्वरित रत्नागिरी, चिपळूण-संगमेश्वर आणि चिपळूण-गुहागर मतदारसंघांकडे सभापतिपदाची संधी वळणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर या तालुक्यांतील सदस्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, कोणाच्या नावावर सभापतीपदाची अंतिम मोहोर उमटते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, समिती वाटपाच्या रचनेतही यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वी उपाध्यक्षांकडे कृषी व पशुसंवर्धन समितीचा पदभार असायचा; मात्र आता उपाध्यक्षांकडे आरोग्य व बांधकाम समितीची जबाबदारी देण्यात येणार आहे. परिणामी कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी स्वतंत्र सभापती निवडला जाणार असून, त्या पदालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

