(रत्नागिरी)
लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांसह चालू अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. वन जमिनींवर जर कोणी काम करत असेल तर वन विभागाने सतर्क राहून अशांवर तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. नव्याने दाखल अर्जांबाबत काय कार्यवाही केली याबाबतही संबंधित विभागाने अहवाल देण्याबाबत सांगितले.
प्रलंबित अर्ज तसेच लोकशाही दिनात येणारे अर्ज तात्काळ मार्गी लावावेत. त्याबाबतचा अहवाल आठवड्याभरात द्यावा. जिल्हा परिषद, बांधकाम विभागाने आलेल्या अर्जाबाबत योग्य प्रक्रिया राबविली आहे का हे तपासावे. नसल्यास, जमिनीच्या नुकसानीचा मोबदला देण्याबाबत कार्यवाही करावी. मोजणीचे विषय मार्गी लावावेत. ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र किल्ले रसाळगड येथील जनसुविधा केंद्र, रस्त्यांचे डांबरीकरण, सरंक्षण भिंत याबबात जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करावा. वन विभागाने त्यांच्या जमिनींवर कोणीही कामे करीत असतील तर त्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

