(तेहरान)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत आपली भूमिका काहीशी मवाळ केली आहे. शत्रू देशांशी संबंधित जहाजे वगळता इतर सर्व जहाजांसाठी हा महत्त्वाचा जलमार्ग खुला ठेवण्यात येणार असल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर निर्माण झालेला ताण काहीसा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्पचा इशारा आणि इराणची प्रतिक्रिया
होर्मुझ सामुद्रधुनी 48 तासांत खुली न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर धडक कारवाई करण्याची धमकी अमेरिकेकडून देण्यात आली होती. जर इराणनं याप्रमाणे केलं नाही, तर अमेरिका त्यांच्या विविध वीज प्रकल्पांवर हल्ला करून त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. या धमकीनंतर काही तासांतच इराणने आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले.
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील (IMO) इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी सांगितले की, इराणच्या शत्रूंशी संबंध नसलेल्या जहाजांना सुरक्षा समन्वय साधून या मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
मुत्सद्देगिरीवर भर, पण आरोप कायम
इराणने मुत्सद्देगिरीला प्राधान्य देण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. मात्र, या तणावासाठी अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले जबाबदार असल्याचा आरोपही इराणकडून करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदल युती उभारण्याचा प्रयत्न केला असला, तरी अनेक नाटो देशांनी थेट लष्करी कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि द्रव नैसर्गिक वायूचा पुरवठा या मार्गाने होतो. इराणने यापूर्वी हा मार्ग बंद ठेवल्याने जागतिक बाजारात तेलदर वाढले आणि ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली होती. अनेक जहाज कंपन्यांनी या मार्गावरून प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला होता. सध्याच्या घडामोडींमुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव काहीसा कमी होण्याची चिन्हे दिसत असली, तरी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष कायम असल्याने परिस्थिती अजूनही नाजूक आहे.

