( मुंबई )
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले तरी, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आधीच आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवली, धुळे आणि पनवेल महापालिकांमध्ये भाजपचे एकूण सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने पहिली आघाडी घेतली आहे. प्रभाग ‘अ’ मधून रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने या प्रभागात उमेदवार न दिल्याने त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नव्हता.
डोंबिवलीतील प्रभाग 26 (क) मधून आसावरी नवरे आणि प्रभाग 26 (ब) मधून रंजना पेणकर या दोघींचाही बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे केडीएमसीमध्ये भाजपचे एकूण तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
धुळे महापालिका
धुळे महापालिकेत भाजपच्या दोन नगरसेविकांची बिनविरोध निवड झाली आहे.
▪️ प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला रणजीत राजे भोसले
▪️ प्रभाग क्रमांक 6 (ब) मधून ज्योत्स्ना प्रफुल पाटील
छाननी प्रक्रियेत विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने दोन्ही ठिकाणी भाजपचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
पनवेल महापालिका
पनवेल महापालिकेतही भाजपला बिनविरोध यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेकाप–महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने भाजपचा विजय निश्चित झाला.
निवडणुकीआधीच भाजपची आघाडी
मतदानापूर्वीच विविध महापालिकांमध्ये बिनविरोध निवडी झाल्याने भाजपला आघाडी मिळाल्याचे चित्र दिसत आहे. येत्या 15 जानेवारीच्या मतदानात या निकालांचा परिणाम किती दिसतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

