(छत्रपती संभाजीनगर )
जागतिक दर्जाचे चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकराव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (AIFF) उद्घाटन गुरुवारी (29 जानेवारी) एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. यंदाचा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार व पद्मविभूषण सन्मानित इलायाराजा यांना भारतीय चित्रपट संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
पैठणीचा शेला, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर इलायाराजा यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत, “वाद्यांमधून तयार होणारे संगीत कानांपर्यंत पोहोचते, पण भावनांतून निर्माण होणारे संगीत थेट हृदयापर्यंत पोहोचते,” असे भावनिक प्रतिपादन केले.
1545 चित्रपटांचा प्रवास; आजही संगीताचा विद्यार्थी
पद्मपाणि पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना इलायाराजा म्हणाले की, “मी कोणतीही ठराविक चौकट न ठेवता थेट संगीत लिहितो. आतापर्यंत 1545 चित्रपटांसाठी संगीत दिले असून, तेवढ्याच दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. मी संगीत तयार करताना कोणतीही नव्या तांत्रिक युक्त्या वापरत नाही. सातत्याने काम करतो आणि आजही स्वतःला संगीताचा विद्यार्थीच मानतो.” विशेष म्हणजे, “आज सकाळीच माझ्या 1545 व्या चित्रपटाचे संगीत पूर्ण करून मी या महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगरला आलो,” अशी माहिती देत त्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित केले.
यांत्रिकतेच्या युगात भावनांचे संगीत महत्त्वाचे
आजच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने संगीत निर्मिती सोपी झाली असली, तरी सराव, भावना आणि वाद्यांमधून साकारलेले संगीतच मनाला भिडते, असे मत इलायाराजा यांनी व्यक्त केले. “आज गावोगावी आणि घरोघरी संगीतकार दिसतात. पण भावनांशी नाळ जोडलेले संगीत कायम टिकते,” असे ते म्हणाले. पद्मपाणि पुरस्कार स्वीकारताना मनापासून आनंद झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
इलायाराजा यांनी नऊ भाषांमध्ये सात हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले असून, भारतीय चित्रपट संगीतात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. चेन्नईहून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.
महोत्सवाची समृद्ध परंपरा; नवे पुरस्कार जाहीर
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल म्हणाले की, “अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाचे इतिहासाशी वेगळे नाते आहे. येथे पद्मपाणि, सुवर्ण कैलास यांसारखे परंपरा जपणारे पुरस्कार दिले जातात. पुढील वर्षापासून मराठी चित्रपट स्पर्धेसाठी ‘सुवर्ण शालीवाहन पुरस्कार’ देण्यात येणार आहे.”
अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या भव्य प्रारंभामुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा जागतिक चित्रपट संस्कृतीच्या नकाशावर केंद्रस्थानी आले आहे.

