(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यात यंदाच्या अवकाळी पावसाने आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने मिरची उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरांत वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखट-मसाल्यांची तयारी सुरू झाली असली, तरी मिरचीच्या वाढलेल्या दरांनी गृहिणींचे गणितच बिघडवले आहे.
बाजारपेठेत तयार मसाल्यांचे विविध पर्याय उपलब्ध असले तरी पारंपरिक पद्धतीने घरीच मसाले तयार करण्याला अजूनही प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लाल मिरची, धणे, जिरे, बडीशेप तसेच विविध खडे मसाले खरेदी करून ते वाळवून गिरणीत दळण्याची लगबग सध्या सुरू आहे. मात्र, यंदा मिरचीची आवक अपेक्षेपेक्षा कमी असल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे. लाल मिरचीच्या विविध प्रकारांमध्येही मोठी दरतफावत दिसून येत आहे. लवंगी मिरची प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये, गुंटूर २५० ते ३०० रुपये, संकेश्वरी २५० ते ३०० रुपये, ब्याडगी ४०० ते ५०० रुपये, तर काश्मिरी मिरची ५५० ते ६०० रुपये किलो दराने विक्रीस आहे. घाऊक बाजारातील वाढीव दरांचा परिणाम किरकोळ विक्रीवरही झाला असून, किराणा बाजारात ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.
मिरचीबरोबरच गरम मसाल्यासाठी लागणाऱ्या खड्या मसाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. लवंग ८०० रुपये, काळीमिरी ७५० रुपये, दालचिनी ३०० ते ४८० रुपये, तेजपत्ता २५० रुपये, मसाला वेलची १,८०० ते २,३०० रुपये, दगडफूल १,५०० रुपये, नागकेशर ३,००० रुपये, चक्रीफूल ४०० रुपये, तर वेलची तब्बल ५,००० रुपये किलो दराने विकली जात आहे.
हवामानातील अनिश्चित बदल, अवकाळी पाऊस आणि कीडरोगांमुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादन घटले असून बाजारातील आवक मर्यादित राहिली आहे. मागणी कायम वाढत असल्याने दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ बसत आहे. विशेषतः उन्हाळी मसाला तयारीच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे घरगुती अर्थकारणावर अतिरिक्त ताण जाणवत आहे.

