(रत्नागिरी/ चिपळूण प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती एकत्रितपणे रणनिती आखणार असल्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी नुकतेच दिले असतानाच, मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या बैठकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन घटक पक्षांची उपस्थिती राहिली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मात्र स्पष्टपणे ‘साइडलाइन’ राहिल्याने महायुतीत अंतर्गत नाराजीचे वारे वाहू लागले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महायुती म्हणून लढण्याचा निर्णय अधिकृतपणे पुन्हा अधोरेखित करण्यात आला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण न दिल्याने ‘मित्रपक्ष’ डावलल्याची चर्चा जोर धरत आहे.
नगराध्यक्षपदासाठीची रस्सीखेच अजूनही कायम असून, विशेषतः चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरूनच वाद पेटल्याचे समजते. या पदासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाची समीकरणे गुंतागुंतीची बनली असून, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर तीन दिवसांत घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीला गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, सदानंद चव्हाण, सुभाष बने, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या घडामोडीवर आमदार शेखर निकम यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “महायुतीचा निर्णय यापूर्वीच झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस त्यास सहमत आहे. मात्र मुंबईतील बैठकीसाठी आमंत्रणच नव्हते, त्यामुळे आमचे कोणतेही पदाधिकारी तेथे उपस्थित राहिले नाहीत,” असे निकम म्हणाले.
आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदांच्या वाटपावरून महायुतीतील तिढा सुटतो का, की मित्रपक्षांमध्ये पुन्हा मतभेद उफाळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील काही दिवसांतच या राजकीय समीकरणांचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

