(जैतापूर / वार्ताहर)
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून क्षणभर विरंगुळा मिळावा, महिलांना आनंद, समाधान आणि अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त व्हावी या उदात्त हेतूने चैतन्य संस्था व सारथी महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी संघामार्फत स्वयंसहायता बचत गटातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली एक दिवसीय धार्मिक सहल उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली.
राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील नवेदर, आडीवरे, कालिकावाडी, भालावली, मोगरे, राजवाडी, नाटे, धावलवली, जैतापूर, दळे, कुवेशी, दांडे, अनसुरे, आडीवाडी आदी गावांमधील सुमारे २५० महिला या सहलीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सहलीचा उत्साह पाहण्यासारखा होता.
या सहलीसाठी राजापूर आगारातून सहा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या बस उपलब्ध करून देण्यासाठी राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया शेठ सामंत यांनी दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले.
सहलीदरम्यान कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या पवित्र जन्मस्थळाचे दर्शन घेण्यात आले. तसेच परिसरातील दत्त मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळांना भेट देत महिलांनी भक्तिभावाने प्रार्थना केली. पुढे कुडाळ-पिंगुळी येथील सद्गुरु राऊळ महाराज मठ तसेच देवगड तालुक्यातील हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथेही दर्शन घेऊन सहलीचा आध्यात्मिक आनंद द्विगुणित झाला.
संपूर्ण सहलीदरम्यान महिलांनी नाच-गाणी, खेळ, गप्पा आणि “जय जय राम कृष्ण हरी”च्या जयघोषात वातावरण भारावून टाकले. या सहलीमुळे महिलांना मानसिक ताजेपणा, आपुलकीची भावना आणि एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून श्रद्धा आणि संस्कार अधिक दृढ झाले.
या सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी त्रिवेणी संघाच्या पदाधिकारी श्रीमती प्रतिभा मयेकर, सौ. रेशम लाड, सुषमा पांचाळ, राजश्री पांचाळ, सिद्धी चव्हाण, श्वेताली तीर्लोटकर, दीक्षा वाडेकर तसेच कार्यकर्त्या रूपाली मोरे, प्रतिभा मोहिते, प्रज्ञा भडेकर, संगीता बाणे यांनी अथक परिश्रम घेतले. संघाचे व्यवस्थापक राजन लाड यांनीही नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत सहल सुरळीत पार पाडली.
सहलीसाठी विशेष सहकार्य करणारे आमदार किरण उर्फ भैया सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्रिवेणी संघ व सर्व महिलांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ही सहल केवळ प्रवास नव्हे, तर आनंद, एकजूट आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम ठरली.

