(रत्नागिरी)
तालुक्यातील पावस येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार देसाई बंधू आंबेवाले यांनी कोकणातील नैसर्गिक चवीचा वारसा जपत ‘मँगो ड्रिंक’, ‘रॉ मँगो ड्रिंक’ आणि ‘कोकम ड्रिंक’ ही नवीन उत्पादने बाजारपेठेत सादर केली आहेत. या उत्पादनांचा शुभारंभ रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
ही उत्पादने १ एप्रिलपासून देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध होणार असून, लवकरच अमेरिकेतही निर्यात केली जाणार आहे. प्रत्येक उत्पादनाची किंमत ५० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
पावस येथील ज्येष्ठ आंबा बागायतदार जयंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पिढीतील आकाश देसाई, आर्य देसाई, तनया देसाई आणि रोहन देसाई यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. कोकणातील पारंपरिक चव आणि शुद्धता जपण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
ही सर्व उत्पादने पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आली असून, त्यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग, रसायने किंवा अतिरिक्त घटकांचा वापर केलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना आरोग्यदायी आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध होणार आहे.
या शुभारंभप्रसंगी आनंद देसाई, अमर देसाई, रोहन देसाई, सुदेश मयेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

